मुंबई उपनगरातील मालाड येथील कुरार गावच्या केंद्रस्थानी असलेल्या दत्तवाडीत सन १९७० च्या आसपास ईश्वरी इच्छा, स्थानिक लोकांच्या प्रयत्नातून श्रीदत्तउपासनेचे बीज रोवले गेले त्यातून श्री दत्तमंदिराचे रोप निर्माण झाले पुढे प. पू. सद्गगुरु तुकाराम गोविंद भारती याच्या मार्गदर्शनाखाली १९७५ साली प्रथमच सार्वजनिक व विशाल स्वरूपात दत्तजयंती साजरी केली गेली. याच दरम्यान मंदिरात गुरुचरित्र पारायण, नामसंकिर्तन, हरिनाम सप्ताह व अन्नदान असे कार्यक्रम सुरु झाले. नंतर प. पू. शांताराम मूळम बाबांनी मंदिरातील पूजा व धार्मिक सेवेची धूरा सांभाळली. मंदिरातून काही ग्रंथनिरूपणकार व अनेक हरिभक्त तयार झाले.
सन २०१२ साली लोकसहभागातून श्रीदत्तमंदिराचा जीर्णोद्धार करून नूतन मूर्तीत श्रीदत्तप्रभूंची पुर्नप्रतिष्ठापना करण्यात आली. नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात गर्भगृहाच्यावर पहिल्या मजल्यावर असलेले श्रीयंत्र हे एक दूर्मिळ असे मंदिराचे वैशिष्ट्य आहे. त्यासोबतच मंदिराच्या दारावर असलेली विविध पौराणिक चित्रे व यंत्रे ही मंदिरातील सकारात्मक उर्जा वाढवण्यास सहाय्य करतात.
नव्यानेच साकारण्यात आलेली व महाराजांची मागे असलेली प्रभावळ ज्यावर महाराजांच्या शोडषअवतारांच्या (सोळा अवतारांच्या) मुद्रा व त्यासोबत असलेली इतर वैशिष्ट्ये ही श्री दत्तमहाराजांचे सर्व मंत्रस्वरूपाय, सर्व यंत्रस्वरूपाय, सर्व तंत्रस्वरूपाय, तसेच सर्व पल्लवस्वरूपाय रूप प्रदर्शित करतात. आणि या साऱ्या गोष्टी श्रीदत्तमंदिराचे वेगळेपण प्रस्थापित व सिद्ध करतात कारण हे सारं एकत्र इतरत्र कुठेच नाही.आहे. कोरोना हा त्याचा सर्वाना ठाऊक राहील असा पुरावा आहे. गेली २० हून अधिक वर्षे आपण भिवपुरी तसेच पालघर येथील बांधवांसाठी, शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कपडे, चादर, पांघरूण, खाऊ यांचे वाटप केले. तसेच गेली ४ वर्षे शाळेतील भगिनींसाठी वर्षभरासाठी सॅनिटरी पॅड यांचे वाटप करत आहोत. आपल्या वस्तीत गरजूना धान्यवाटप, औषधे यांचेही वेळोवेळी वाटप होत असते. तसेच शाळेतील मुलांना अभ्यासासाठी मार्गदर्शन, तरुणांना गरजेनुसार त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी नोकरी व्यवसायसाठीही मार्गदर्शन केले जाते.
पन्नास वर्षे म्हणजे संस्थेच्या दृष्टीने परिपक्वतेचा टप्पा ठरतो, फार प्राचीन काळापासून मठ, मंदिरे, देवालये ही धर्मजागरणा सोबत समाजप्रबोधनाचे व जनतेच्या व्यवहारीक व परमार्थिक प्रगतीचे माध्यम म्हणून कार्य करीत आली आहेत. असेच कार्य आपल्या मंदिराकडूनही व्हावे अशी आमची प्रामाणिक ईच्छा आहे आणि त्यासाठी आपले सहकार्य व सहभाग अत्यंत आवश्यक आहे. आमचा प्रयत्न असतोच सर्वाना जोडण्याचा, आम्ही जागरूक आहोतच समाज जागृतेसाठीच, आम्ही प्रयत्नशील आहोतच भक्तीच वलय वाढवण्यासाठी, आम्ही कटिबद्ध आहोतच आध्यात्म प्रचार आणि प्रसारासाठी, आम्ही कार्यशील आहोतच महाराजांच्या भेटीसाठी एकदा तरी पाहून डोळे तृप्त करण्यासाठी. फक्त साथ तुमची हवी, तुमचा सहभाग हवा, तुमचे मार्गदर्शन हवे, तुमचे सल्ले हवेत, तुमचा बहुमूल्य वेळ हवा. हा भवसागर तरुन जाण्यासाठी आपणा सर्वांना महाराजांची साथ हवी.
श्री योगिराज : १
अद्वयानंदरूपाय योग माया धराय च ।
योगिराजाय देवाय श्रीदत्तात्रेय नमो नमः ।।
अद्वयानंदरूपाय योग माया धराय च ।
योगिराजाय देवाय श्रीदत्तात्रेय नमो नमः ।।
श्री योगिराज हा पहिला अवतार. याची मूळ पिठिका पहाणे आवश्यक आहे. वेदधर्ममुनी आपल्या प्रिय शिष्य दीपकास सांगतात. ब्रह्मदेवाने एकदा भगवान् नारायणास नमस्कार करून मी संसारदुःखातून तरण्याकरता काय करावे? असा प्रश्न केला. तेव्हा नारायणाने थोडक्यात सांगितले की माझ्या सात्विक स्वरूपाची उपासना कर, मी तुला माझे दान केले आहे, असे सांगून मी दत्तरूपाने अवतीर्ण झालो. ते माझे दत्तस्वरूप सात्विक असून सर्वांना उपास्य आहे.
धर्मपालनाकरिता स्वाश्रमादिकांचा स्विकार करणाऱ्या रामकृष्णादिक अवतारांशी माझे ऐक्य असले तरी अत्याश्रमी असलेले माझे दत्तस्वरूप सुरासुरांना तसेच रामकृष्णादिकांच्या गुरूस्थानी असलेल्या वशिष्ठादि महर्षीनाही उपास्य आहे. भगवान् दत्तात्रेय अयोनिसंभव आणि अत्याश्रमी असल्यामुळे सर्वांनाच सेवनीय, वंदनीय व आदरणीय आहेत. परिपूर्ण परब्रह्म सच्चिदानंद हे त्यांचे खरे स्वरूप आहे. त्यांचे वर्णन करिण्याकरिता वेद प्रवृत्त झाले. परंतु चकित होऊन ते स्वस्थ बसले. कारण वाणीला ते वर्णन करता येण्यासारखे नाही. या परब्रहम्याने स्वात्मशक्ती मायेचा स्विकार करून सर्व चराचर निर्माण केले. असे कार्य करुनसुद्धा त्यांचे अकर्तृत्व सिद्ध आहे. याच परमेश्वराने महत्तत्त्व अहंकार पंचभूते अशा क्रमाने ब्रह्मांड चतुर्दशभुवने भोग्यचराचर जगत् उत्पन्न केले. आणि जलामध्ये शयन केले. त्यास नारायण अशी संज्ञा प्राप्त झालीं. त्यांच्या नाभिकमळापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाला. त्याने तप करून नारायणापासून सर्व सामर्थ्य मिळविले. आणि सनकादिकांना निर्माण केले. नंतर मरीची अत्री आदी मुनी उत्पन्न केले. आपल्या छायेपासून कर्दममुनी निर्माण केले. आपल्या शरीरापासून शतरूपा स्त्री व मनु नावाचा पुरूष असे दांपत्य उत्पन्न केले. त्यांनी पुढील सृष्टी केली. त्या मनूला प्रियव्रत व उत्तानपाद असे दोन पुत्र व आकूती, देवहूती आणि प्रसूती अशा तीन कन्या झाल्या. मनुने कर्दममुनीला देवहूती दिली. त्या दोघापासून नऊ कन्या झाल्या. त्या मरीची अत्रीप्रभृती मुनीना दिल्या. अर्थात अत्रीचा आणि अनसूयेचा विवाह ब्रह्मदेवाच्या आज्ञेने झाला. अत्री हे ब्रह्मज्ञानी ब्रह्मानंदात निमग्न होते. त्यांना कशाचीही इच्छा नव्हती. तथापि, ब्रह्मदेवाने अनुसूयेबरोबर त्यांचा विवाह करून त्यांना प्रजा उत्पन्न करण्याची आज्ञा केली. ‘जीवतो वाक्य करणात्’ या शास्त्राप्रमाणे पित्याची आज्ञा प्रमाण मनूने प्रजा निर्माण करण्याकरिता पत्नीसह ऋक्ष पर्वतावर जाऊन तपाला सुरवात केली. त्यांचे तप शुद्ध व तेजस्वी असल्यामुळे त्यांचेवर अनुग्रह करण्याकरिता कार्तिक शुद्ध पौर्णिमा बुधवार पहिल्या प्रहरात पहिल्या मुहूर्तावर योगिराज हा अवतार झाला. यादिवशी योगिराज जयंती म्हणून त्याचे पूजन करावे. नंतर तीन अर्घ्ये द्यावीत नारीकेल फळ समर्पण करावे. योगिराज मंत्राचा जप करावा. प्रभूची प्रार्थना करून कथा श्रवण करावी.
श्री अत्रिवरद : २
मालाकमंडलुरध:करपद्मयुग्मे ।
मध्यस्थ पाणियुगले डमरू त्रिशूले ।
यस्यस्तउर्ध्वकरयोः शुभशंखचक्रे ।
वंदे तमत्रिवरदं भुजषट्क युक्तम् ।।
मालाकमंडलुरध:करपद्मयुग्मे ।
मध्यस्थ पाणियुगले डमरू त्रिशूले ।
यस्यस्तउर्ध्वकरयोः शुभशंखचक्रे ।
वंदे तमत्रिवरदं भुजषट्क युक्तम् ।।
जो योगिराज अवतार त्यानेच कालांतराने अत्रिवरद हा दुसरा अवतार धारण केला. ऋक्ष पर्वतावर असलेल्या पवित्र तीर्थावर अत्री हे पित्याच्या आज्ञेने तप करीत होते हे त्यांचे तप जितेन्द्रीयपणे वायु भक्षण करून चालू होते. एका पायावर उभे राहून ज्ञानानंद घनरूप योगिराजाचे चिंतन ते करीत असत. हा भगवान् आपल्यासारखी संतती मला देवो अशा अभिप्रायाने ते त्यांचे तप सुरू होते. त्यांच्या तपास शंभर वर्षे झाली असता त्यांचे मस्तकापासून महत्तेज निघाले. ते अत्यंत उग्र असल्यामुळे त्रैलोक्यास पीडा होऊ लागली भूचर, खेचर, देवदानव सर्वच भीतीग्रस्त झाले. देवर्षीने ब्रह्मा विष्णु महेशांची प्रार्थना केली.
भिऊ नका असे आश्वासन देऊन ब्रह्मा विष्णु महेश मुनींच्या आश्रमास आले. आणि आपल्या सामर्थ्याने अत्रीस तपापासून विचलीत केले. ते बाह्य दृष्टीने पाहू लागले असता पुढे त्यांना ब्रह्मा विष्णू महेश दिसले. त्यांनी त्यांचे पूजन केले. मी एकाचे ध्यान करीत असता आपण तिघे या ठिकाणी कशा करिता आलात, माझ्या संशयाचे निरसन करा. माझ्या साहसाची मला क्षमा करा. तेव्हा ते म्हणाले वत्सा तुझे कल्याण असो. तू सत्यसंकल्प आहेस. ज्या एकाचे तू ध्यान केलेस तेच आम्ही तिघे एकरूप आहोत. आमच्यात भेद नाही. हे मुनिश्रेष्ठा आम्ही एक असून उत्पत्ति स्थिती संहाररूप कार्याकरिता गुणोपाधिभेदाने त्रिविधत्व कल्पिले आहे. आमचे पूर्वी पाहिलेले अलौकिक रूप पहा. असे सांगून ते गुप्त झाले. नंतर दशदिशा प्रकाशित करणारे शुद्धस्फटिकाप्रमाणे तेजस्वीरूपाने योगमार्ग प्रवर्तक योगिराज प्रकट झाले. अत्रींच्या शुद्ध तपाने संतुष्ट झालेला योगसिद्धी देणारा योगिराज क्षणाने अत्रींना वर देण्याकरिता त्रिगुणात्मक षड्भुज प्रसन्नवदनरूप धारण करून प्रकट झाला. कार्तिक कृष्ण प्रतिपदा रोहिणी नक्षत्र, गुरूवार, प्रथम प्रहर, प्रथममुहूर्तावर हा अत्रिवरद नावाचा दुसरा अवतार ब्रह्मा विष्णु शिवात्मक आहे. त्याचे ध्यान मालाकमंडलुः असे वर दिले आहे. यांनी धारण केलेली आयुधे निष्प्रयोजन आहेत असे म्हणता येत नाहीत आणि स्वत:च्या कार्यसिद्धीकरताही नाहीत. कारण अद्वितीय परमात्म्याला माळेचा काय उपयोग. जप कोणाचा करावयाचा आहे? निष्क्रीय आणि निर्विकार प्रभूनी कमंडलूने कोणती क्रिया करावयाची आहे? स्वानंदनिमग्नाला भीतीच नसल्यामुळे त्रिशूल चक्राचे काहीच कारण नाही. तथापि स्वभक्तांवर अनुग्रह करण्याकरता भगवंतानी ही माळादिक आयुधे धारण केली आहेत. या एका शरीरात दोन स्वरूपाची कल्पना आहे. दक्षिणेचा भाग गुरूरूप धारण करणारा आहे आणि वामभाग ईश्वर रूप धारण करणारा आहे. दक्षिण हातामध्ये माळा आहे. अ पासून क्ष पर्यंत ५२ वर्णाची ती असून सर्व मंत्रहारित आहे. निगमातील सर्व मंत्र सबीज सरहस्य त्यात आहेत. मंदमुमुक्षूंना देण्याकरिता त्यातील मंत्राचा उपयोग आहे. त्यावरच्या हातात डमरू आहे. त्यामध्ये सर्वशास्त्रे आहेत. ती मंदमुमुक्षूंकरिता आहेत. त्या शास्त्राने त्यांना मुक्ती मिळते. त्यावरच्या हातात चक्र आहे ते तेजस्वी असून अज्ञानाचा नाश करणारे आहे ते उत्तमाधिकाऱ्यांना मुक्ती देते. अविद्या काम कर्मरूप बंधनाचा छेद करून आवरण नाश व आत्मप्रकाश करण्यास समर्थ आहे. याप्रमाणे क्रमाने मोक्षोपयोगी ही आयुधे आहेत. वामभाग ईश्वराचा आहे. त्या बाजूच्या हातामध्ये कमंडलू असून कर्मात्मक जळ त्यात आहे. त्या कर्माप्रमाणे ईश्वर जीवांना फलदान करतो, अन्नपानादिकांची व्यवस्था त्या कर्मावरच अवलंबून आहे. जीव व कर्म अनादि आहे. जीव हा वस्तुत: ब्रह्म असून मायेमुळे देहतादात्म्याला प्राप्त होतो. त्यामुळे संसार प्राप्त होतो. दुसऱ्या हातात प्रकाशमान त्रिशूल आहे. आचार व्यवहार व प्रायश्चित्त अशी त्यांची तीन टोके आहेत. त्यामुळे धर्मार्थकाम यांची प्राप्ती होते. त्यामुळे जगताची स्थिती घडत असते. तिसऱ्या हातात महाशब्द करणारा दिव्य शंख आहे यामुळे कर्माचे ज्ञान होते. त्यामुळे जगच्चक्र ईश्वराज्ञेने चालू राहते. हा भाग जगत्स्थितीकरता आहे. आणि गुरूभाग मोक्षाकरिता आहे. अशी या अवताराची श्रेष्ठता आहे. कार्तिक कृष्ण प्रतिपदे दिवशी याचे पूजन करावे. तीन अर्घ्ये द्यावीत. कदलीफल समर्पण करावे. हा दिवस जयंतीचा याने भगवान संतुष्ट होऊन सर्वशुभफळे देतो. स्वस्वरूपाचे दानही करतो असा याचा दिव्य महिमा आहे.
दत्तात्रेयावतार : ३
दत्तात्रेयाय शांताय दिव्यरूपधराय च ।
नमोऽस्तु सत्त्वशीलाय भक्तानुग्रहकारिणे ।।
दत्तात्रेयाय शांताय दिव्यरूपधराय च ।
नमोऽस्तु सत्त्वशीलाय भक्तानुग्रहकारिणे ।।
अत्रीला वर देण्याकरिता आविर्भूत झालेले भगवान म्हणाले तुझ्या भक्तीने आणि अनसूयेच्या सेवेने मी प्रसन्न झालो आहे. तुम्हाला जो वर इष्ट असेल तो मागून घ्या. हे भगवंताचे उदार वचन श्रवण करून अत्रीने अनसूयेच्या मुखाकडे पाहिले आणि हात जोडून सांगितले मला स्वर्ग मृत्यु, पाताळ यातील काहीही मागावयाचे नाही आपण प्रसन्न असाल तर आपल्यासारखा पुत्र मला द्या. अन्य कशाचीही मला इच्छा नाही. तेव्हा भगवंतांनी दयाक्षमारूप गुणशील शमादिकांनी माझ्यासारखा दुसरा कोणी नाही असा विचार करुन
स्वत:च पुत्र व्हावे असा निश्चय करून आपले सत्त्वप्रधानरूप धारण केले. मी माझे दान तुला करतो. मी तुमच्या स्वाधीन आहे असे सांगून कार्तिककृष्ण द्वितीया शुक्रवार मृग नक्षत्र प्रथम प्रहर प्रथम मुहूर्तावर दिव्य रूपाने मुनींपुढे आविर्भुत झाले. हे विश्वगुरू ज्ञानविधी योगीजनप्रिय सर्वसाक्षी सिद्धसेवित भक्तावर अनुग्रह करणारे असे दिव्यरूप होते. अत्रीने त्याचे ध्यान करून भार्येसहित त्या प्रभूला नमस्कार केला. आपण माझा भाव जाणून ह्या रूपाने आत्मदान केले ते खरे. परंतु औरसपुत्राची इच्छा करणाऱ्या आमची तृप्ती झाली नाही म्हणून औरस पुत्ररूपाला आपण प्राप्त व्हावे. आणि मंगलमय असलेले हे दिव्यरूप लोकोद्धाराकरीता भूतलावर राहो, अशी प्रार्थना केली. भगवान् प्रभु तथास्तु म्हणाले. त्याप्रमाणे हा अत्रिवरद भक्त संतोषाकरिता तसाच राहिला आहे. त्याचे पूजन त्याच्या जयंतीवर करावे. अर्घ्यत्रय त्यास द्यावेत. ऊस त्यांना अर्पण करावा. भगवान प्रसन्न होतो. कामना पूर्ण करतो.
श्री काळाग्निशमन : ४
ज्ञानानंदैकदीपाय काळाग्निशमनायच ।
भक्तारिष्ट विनाशाय नमोऽस्तु परमात्मने ।।
ज्ञानानंदैकदीपाय काळाग्निशमनायच ।
भक्तारिष्ट विनाशाय नमोऽस्तु परमात्मने ।।
अनसूया आणि अत्री यांच्या तपाचे फळ म्हणजे काळाग्निशमन हा अवतार होय. तपापासून निवृत्त झालेले अत्री भार्येसह आपल्या आश्रमास आले. नंतर ते ध्याननिष्ठ राहू लागले. याप्रमाणे बराच काळ गेला असता त्यांच्या शरीरात तपापासून निर्माण झालेला भयंकर वन्ही काळाग्निप्रमाणे वाढून त्याचे अंतरंग जाळू लागला. हे जाणून कारूणिक भगवान् त्याच्या
शांतीकरिता तत्काळ अत्रीच्या मस्तकाचे विदारण करून आत शिरले. अति शांत असलेले भगवान शरीरात प्रविष्ट होऊन त्यांनी तो सर्व वन्ही शांत करून अत्रींना पूर्ण शांतता प्राप्त करून दिली. नंतर अत्रींनी डोळे उघडून ऋतुस्नात पुत्रकाय महाभाग्यवती अशा आपल्या भार्येकडे पाहिले. तेव्हा त्यांच्या नेत्रापासून दैदीप्यमान असे तेज बाहेर पडले आणि सर्व लोक पहात असताना पुण्ययोगामुळे अनसूयेच्या शरीरात प्रविष्ट झाले. तो शुभदिवस मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी होता. ते तेज गर्भरूपाने परिणत झाले. नऊ दिवस हे नऊ मास अशी कल्पना भगवंतानी केली. स्वत:चे वाक्य परिपालनाकरिता व भक्तावर अनुग्रह करण्याकरिता अज, अव्यय भगवान अनसूया गर्भसंभव झाला. अनसूया गर्भिणी झाली असे लोकात प्रसिद्ध झाले. अयोनिसंभव भगवान् सर्व लोकांना सुखकारक असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा बुधवार मृग नक्षत्र प्रदोषकाळी स्वर्गातून देव पुष्पवृष्टी करीत असता अनसूयेपासून चंद्र दत्त दुर्वासरूप भगवान् आविर्भूत झाले. ब्रह्मांशचंद्र, शंकरांश दुर्वास आणि विष्णू हे दत्त असे तिघेही एकरूप आहेत. जगत्कार्य करणे आणि भक्तांना आनंदित करणे हा त्यांचा स्वभाव. बाळभाव धारण करून अनसूया स्तनपान करावे. मातापितरांना त्यांच्या स्वाधीन होऊन संतोष उत्पन्न करणारा हा अवतार आहे. मार्गशीर्ष पौर्णिमेस ऐश्वर्यानुरुप पूजन अर्घ्यदान आणि पंचामृतसमर्पण करून ईश्वर संतोष संपादन करावा.
श्री योगिजनवल्लभाय नम : ५
योगविज्जननाथाय भक्तानंदकरायच ।
दत्तात्रेय देवाय तेजोरूपाय ते नमः ।।
योगविज्जननाथाय भक्तानंदकरायच ।
दत्तात्रेय देवाय तेजोरूपाय ते नमः ।।
सनातन परमात्मा श्रीदत्त कालाग्निशमन नावाने अत्रींच्या गृहात अवतीर्ण झाला आहे हे समजल्यावर सर्व देव, ऋषी, गंधर्व, चारण सिद्ध आणि योगी तेथे आले आणि त्यांनी अनसूयापुत्राला पाहिले त्यांच्या समक्ष त्यांनी बाळरूप सोडून स्वयंप्रकाश सनातन तेजोमयरूप धारण केले. या रूपाचे चिंतन करा. अनायासे मोक्ष मिळेल असे त्यांनी दाखविले. अतिसुंदर, योगीजनांना अतिप्रिय असे ते रूप सर्वांनी पाहिले व आश्चर्यचकित झाले.
तेव्हा भगवंतानी सनातन स्वमहात्म्याचा बोध केला. मला जन्म नाही. मला कर्म नाही. मी अजनिर्विकार निर्गुण जसा आहे तसा आहे. मला देह नाही. मला काळ नाही मी मायागुणरहित आहे. भक्तावर अनुग्रह करण्याच्या इच्छेने मायेने झाल्याप्रमाणे दाखवितो. सर्व सुखावह अनुग्रह करतो. सुंदर बाळरूप घेऊन मी ज्या क्रिया करतो त्या केवळ लोक मोक्षाकरिताच आहेत. देव आणि महर्षीनो माझ्या आज्ञेने मी सर्वच आहे. असंग, अनंत, अद्वय आहे असे जो जाणतो तो कर्मबंधातून मुक्त होतो. असे त्या दत्तात्रेयाचे वचन ऐकून सर्व देवादिक आपापल्या स्थानास गेले. हा योगिराजवल्लभावतार मार्गशीर्ष पौर्णिमा गुरूवार दिवशी झाला. त्याचे पूजन करावे, अर्घ्यत्रय दयावेत. भक्ष्यविशेषाचा नैवेदय आणि मौक्तिक समर्पण करून प्रसाद मिळवावा.
श्री लीलाविश्वंभराय नम : ६
पूर्णब्रह्मस्वरूपाय लीलाविश्वंभरायच ।
दत्तात्रेयाय देवाय नमोऽस्तु सर्वसाक्षिणे ।।
पूर्णब्रह्मस्वरूपाय लीलाविश्वंभरायच ।
दत्तात्रेयाय देवाय नमोऽस्तु सर्वसाक्षिणे ।।
योगसिद्धी देणारा योगिजनवल्लभ हा अवतार योग्यांना ध्येय आणि पूज्य आहे. या रूपानेंच भगवान् योग्यांच्या मंडळात राहिले. ते योग्यांना प्राप्त होणारी विघ्ने दूर करून सिद्धीचा लाभ करून देऊ लागले. काळाग्निशमनरूप धारण करणारा दत्त भगवान् कौतुकाने अनसूयेच्या मांडीवर बसून दुग्धपान करतो आहे.
अशा काळात दैवामुळे देशामध्ये अतिवृष्टी, अनावृष्टी यांचा भास उद्भवला. तेव्हा त्रस्त झालेले मुनी आणि मानव दत्तात्रेयाला शरण गेले. सर्वच दीन झाले होते. त्यांचे दीन वाक्य ऐकून स्तनपानरत असलेल्या भगवंतानी त्यांना अभय दिले. स्वसामर्थ्याने अन्नपान देऊन त्यांचे रक्षण केले. लीलेने मुनींना विविध रूपे दाखविली. सर्वच आश्चर्ययुक्त होऊन लीलाविश्वंभराची स्तुती करू लागले. लीलाविश्वंभर हे एखादे वेळी शिष्यांना वेदाध्ययन सांगत, एखादेवेळी ध्यान तप्तर असत. त्यांचे लोकोत्तर स्वरूप पाहून तेच पहात राहावे. याप्रमाणे अध्ययनादिकार्य सोडून मुनी त्यांचे सन्निध्य राहू लागले. त्यांनी त्यांना एकदा प्रपंचाचे वन करून दाखविले. अहंकार हा वृक्षांनी मंडित मोठा पर्वत बनला, काम हा सिंह, क्रोध हे घोडे, मन जलाशय, मोह हे जल, क्रिया हे वृक्ष बनले. असे वन दाखवून भगवान म्हणाले, 'हे वन दुःखकारक आहे. वर वर पाहिल्यास यातील फळे रमणीय आहेत. छाया विषमय, जलही विषमय आहे. पाहिल्याबरोबर कष्ट होतात. मग सेवन केले तर काय होईल. म्हणून हितेच्छूने येथे राहू नये. असे त्याचे वाक्य ऐकूनही फलासक्तीमुळे त्यांनी त्या वनाचा त्याग केला नाही. एकांतात त्यातील मध प्राशन करु लागले. तेव्हा भगवान गुप्त झाले. तेव्हा फलाशेने इतस्तत: भटकू लागले. क्लेश होऊ लागले. यात आपला नाश होणार असे वाटू लागले. तेव्हा देवाचे स्मरण करू लागले. त्यामुळे त्यांना सुख होऊ लागले. फलासक्त होऊन पुन्हा त्यांनी स्मरण सोडले. नंतर विवेकरहित झाल्याने त्यांना मोठे दुःख प्राप्त झाले. भक्तवत्सल भगवंतानी ते वन लुप्त केले. तेव्हा दत्ताचा विरह झाला म्हणून ते शोक करू लागले. तेव्हा दत्तात्रेय आकाशामध्ये प्रकट झाले. त्यांना पाहून आश्चर्याने म्हणाले, ‘भगवन् ते वन कोठे गेले’, भगवान हसले आणि म्हणाले, ‘ज्याच्यापासून उत्पन्न झाले त्यामध्येच ते लीन झाले.’ संसारही असाच आहे, तो दुःखद आहे. त्याचा त्याग करून तत्पर व्हावे. संसारात राहिले तरी त्याची असारता जाणून आत्मज्ञान मिळवावे आणि मुक्तीचा लाभ संपादन करावा. यावर मुनी म्हणतात ‘भगवान, आत्मा कोण, त्याचे ज्ञान कसे होईल. आम्ही साधनहीन दीन आहोत. आमची गती आपणच आहा. आपणच आम्हास बोध करावा.’ अशी प्रार्थना त्यांनी केली. श्रीदत्त सांगतात मीच सर्वांचा आत्मा आहे, माझे ज्ञान कर्मसामर्थ्याने व भक्तीसामर्थ्याने होऊन मानव मुक्त होतो. आम्ही कर्माने, भक्तीने व ज्ञानाने रहित असल्याने आम्हास मुक्ती कशी मिळेल, तुझ्या दर्शनाबद्दल उत्सुक होऊन आम्ही तुझ्याबरोबर रहातो. तुझा त्याग करण्यास आम्ही असमर्थ आहोत. प्रसन्न व्हा आणि कृपा करा. भगवंतानी त्यांचा निश्चय पाहिला. हे घरी कसे जातील, संग योगप्रतिबंधक आहे याकरिता असे करावे असा विचार करून भगवान् सरोवरात बुडाले. तथापि ते तेथेच शंभरवर्षे राहिले. त्यांना वंचित करण्याकरिता पानरतमायामयनारी घेऊन जलातून वर आले. स्त्री संगी म्हणून माझा त्याग करतील. परंतु त्यांनीही ते सुरापानरत नारीने युक्त आहेत, असे पाहून ‘तेजीयसां न दोषाय’ असा निश्चय करुन त्यांचा त्याग केला नाही. सर्वात्मकाला संयोग वियोग नाहीत. लोकशिक्षणाकरिता तसे प्रभु दाखवित आहेत. नंतर भगवान म्हणाले संगापासून काम क्रोध यांचे मुळे पाप शोक मोह होतात. अविवेकी लोकांचा संग सिद्धीचा भंग करतो. विवेकी लोकांचा संग योगसिद्धीस कारण होतो. असा उपदेश लीलाविश्वंभराने केला. हा अवतार पौषपौर्णिमा पुष्य नक्षत्र बुधवार सूर्योदयी झाला. त्याचे पूजनादिक करून मानवाने कृतार्थ व्हावे.
श्री सिद्धराजाय नम : ७
सर्वसिद्धांत सिद्धाय देवाय परमात्मने ।
सिद्धराजाय सिद्धाय मंत्रदात्रे नमोनमः ।।
सर्वसिद्धांत सिद्धाय देवाय परमात्मने ।
सिद्धराजाय सिद्धाय मंत्रदात्रे नमोनमः ।।
लीलाविश्वंभर देव स्वत:च्या रूपाचे आच्छादन करून फिरत फिरत बदरीवनास आले. तेथे पुष्कळ सिद्ध होते. त्यांनी मोठ्या कष्टाने सिद्धी मिळविल्या होत्या. ते सिद्धिसामर्थ्याने कामक्रोधयुक्त झाले. त्यांत नग्न, अनग्न, मौनी, अमौनी, ध्यानस्थ, आसनस्थ, वादविवादरत असे अनेक होते. त्यांना पाहून त्यांचा प्रभाव पाहाण्याकरिता दिव्यरूप भगवान् त्यांचे पाठीमागे बसले.
त्यांचे ते योग सुंदररूप पाहून विचारू लागले की, आपण कोण? त्याचे उत्तर मी अप्रतीत रूप आहे. आपला आश्रय कोण? मी निराश्रय, अनाथ आहे. आपली क्रिया व योग कोणता? मी अक्रिय, माझा चित्रयोग गुरू कोण? मला गुरू नाही. आपली मुद्रा कोणती? माझी मुद्रा निरंजनी. आपले ध्येय काय? ध्यानाभावाने जे मिळते. आपला मार्ग कोणता? अन्याला जाता न येणारा व सुखरूप माझा मार्ग. असा वादविवाद चालू असता आकाशमार्गाने रूद्रवसु आदित्यमरूतादि जात होते. त्यांची गती कुंठित होऊन ते खाली पडले. हे पाहून ‘हे देवाचे पतन आमच्या योगसिद्धीने झाले आहे. ही माझी, ही माझी योगसिद्धी. मी श्रेष्ठ, मी श्रेष्ठ’ असा परस्परवादविवाद सुरू झाला. सिद्धेश भगवान् म्हणाले ‘व्यर्थ विवाद करू नका. माझे मत ऐका, ज्याच्या वचनाने हे पुन्हा वर जातील तो श्रेष्ठ व त्याच्या सामर्थ्याने ते पडले.’ हे सर्वांना पटले. पृथक पृथक प्रत्येकाने माझ्या वचनाने हे सर्व वर जावोत असे म्हटले असताना त्यांचेवर गमन झाले नाही. तेव्हा ते लज्जित अहंकाररहित स्तब्ध पडलेले पाहून दत्त म्हणाले. माझ्या वचनाने हे सर्व वर जावोत. तेव्हा ते आकाशमार्गाने वर गेले आणि हा परमात्मा आहे. असे जाणून त्या सर्वांनी नमस्कार केला, भक्तीने स्तुती केली व आनंदाने स्वर्गी गमन केले. हे आश्चर्य पाहून देवानी केलेली स्तुती ऐकून हा परमात्मा. पूर्णपुरूष श्री दत्त आहे असे सिद्धांना समजले. ते शांत झाले. भक्ती संपन्न अशा त्यांना भगवान म्हणाले. मी परमात्मा, परयोगी, देवदेव सर्वसाक्षी आहे. माझ्या प्रसादाने तुमचे कल्याण होवो. मी प्रसन्न आहे. इष्ट वर मागून घ्या. अनंत सिद्धीला देणारा, परसिद्धीचे हरण करणारा तुझ्यासारखा योग आणि सनातन भक्ती आम्हाला द्या. तेव्हा दत्तात्रेय म्हणाले. माझे सामर्थ्य देणारा योगी न भूतो न भविष्यति. परमात्म्याशिवाय परसिद्धीचे हरणही करता येणार नाही. तेव्हा सिद्ध हो ऐका, योग सांगतो. मी मंत्रराज असल्याने मंत्रसमूहही सांगतो. अनंतशक्तीप्रद योग आणि मंत्रग्रहणाबरोबर सिद्धि देणारे मंत्रही सांगितले. त्यांचे रहस्य व विन्यासही सांगितले. त्यामुळे ते अल्पकाळात सिद्धिसंपन्न झाले. हा अवतार माघ पौर्णिमेस गुरूवारी दिवसा झाला. त्याचे पूजन अर्घ्यदान शुभपुस्तक समर्पण करून ते सिद्ध कृतार्थ झाले. मानवानेही त्या दिवशी जयंती उत्सव करून पूजनादिक करावे. सिद्धराज कृपा संपादन करावी.
श्री ज्ञानसागराय नम : ८
सर्वत्राज्ञाननाशाय ज्ञानदीपाय चात्मने ।
सच्चिदानंदबोधाय श्रीदत्तायनमो नमः ।
सर्वत्राज्ञाननाशाय ज्ञानदीपाय चात्मने ।
सच्चिदानंदबोधाय श्रीदत्तायनमो नमः ।
भगवान दत्तात्रेयानी एकदा त्या सिद्धांना पाहिले आणि विचार केला. काम हा करविता व क्रोध हा कर्ता असल्याने मानवांना स्वतंत्रता नाही. हे सर्व जगत् कामाधिन आहे. ते चिंतेने व्याप्त असून तापत्रयाने गांजलेले आहे. दु:ख देणारा, पाप करविणारा, अनर्थद्वारा पीडा देणारा, काम वाढल्यास अनर्थ वाढतात आणि त्यामुळे जगत् क्षय होतो.
याकरता हे जगत काममुक्त करावे. त्याच्याकरता ज्ञानच आवश्यक आहे. म्हणून ज्ञानयोगमुक्त मुक्तस्वभाव ज्ञानिरूप त्यानी धारण केले. हा ज्ञानसागर अवतार, फाल्गुन शुद्ध दशमी रविवार, पुनर्वसु नक्षत्र सूर्योदयी झाला. या रूपाने सिद्ध सभेत भगवान अंतराळी उच्च स्थानी बसले. ही त्यांची प्रभावी सिद्धी नष्ट करण्याकरता आपल्या योगसामर्थ्याने त्यांनी प्रयत्न केले. तथापि त्यांना त्यांत यश आले नाही. वायूने पर्वत हालविणे असे अशक्य तसे त्यांना जागेवरून हालविता आले नाही. तेव्हा ते सिद्ध विस्मित होऊन प्रश्न करू लागले. तू कोण ? मी अप्रतीत स्वरूप. याप्रमाणे पूर्वीचीच प्रश्नोत्तरे झाली. तेव्हा हा परमात्मा असा निश्चय सिद्धांनी केला. हे देवदेव तुझ्या प्रसादाने आम्ही शक्तीसंपन्न झालो. त्याच बळाने आम्ही स्थानच्युत करण्याचा प्रयत्न केला तथापि तो साध्य झाला नाही. तेव्हा त्वत्समान आम्ही कसे हे सांगा. दत्तात्रेय म्हणाले, सर्वांना हालविणारा वायू आकाशास हलवू शकत नाही. कारण आकाश निरवयव व वायूचे कारण आहे. तसा मायेने मी सर्वकारण आणि निर्विकार. ब्रह्म हे माझे स्वरूप, माझे ठिकाणी कोणताही धर्म नाही तेव्हा सिद्धांचे काय चालणार? आपला अभ्यास विफल आहे. काम हा दुःसह व दुःखद मोह निर्माण करणारा नरकद्वार आहे. कामापासून क्रोध, स्मृतिभ्रंश दुष्टकर्म व नरक ही परंपरा प्राप्त होते. म्हणून काम सोडा; नि:संकल्प व्हा. सिद्ध म्हणाले गुरो देवदेव आमचे रक्षण करा. काम हा शत्रु एकट्या आपल्या प्रसादाने आम्हांस कळले. कामबंधनातून आम्हांस मुक्त करा. ज्ञानसागर म्हणतात पूर्वी मंत्राने सर्वांनी माझे आराधन करावे. माझ्या भक्तीने मुक्ती आहे असा तत्त्वोपदेश करून आत्मज्ञान साधनांत सिद्धांची प्रवृत्ति केली. ज्ञानसागराचे पूजन, अर्घ्यदान व मंदिर समर्पण करावे आणि त्यांची कृपा संपादन करावी.
श्री विश्र्वंभरावधूताय नम : ९
विश्वंभराय देवाय भक्तप्रियकरायच ।
भक्तिप्रियाय देवाय नागप्रियाय ते नमः ।।
विश्वंभराय देवाय भक्तप्रियकरायच ।
भक्तिप्रियाय देवाय नागप्रियाय ते नमः ।।
मंत्रानुष्ठान करणाऱ्या आपल्या भक्तांच्या क्रिया पाहाण्याकरिता. पूर्वीचे रूप आच्छादित करून मलिन अवधूत रूप धारण केले. आणि त्या समाजात जाऊन दुरून त्यांचे चरित्र पाहू लागले. तेव्हा त्यांना काही वृत्तिरहित दिसले तर काही विक्षिप्तचित्त, काही संतापयुक्त. काही त्रस्त काही वादविवादरत, काही अहंकारी, काही कामक्रोध दुष्ट स्वभाव काही ध्यानस्थ, काही संशयग्रस्त असे दिसू लागले. तेव्हा दयाळू दत्तात्रेयाने त्यांची चित्तें हरण केली. ते स्तब्ध झाले.
पुन: सोडली, तेव्हा ते एकाग्र होऊन भगवंताला अनुसरू लागले. याप्रमाणे त्यांच्या बुद्धी आत्मरत केल्या. आणि पुनः सोडल्या तेव्हा ते योगभ्रष्ट होऊन मोहित झाले. छळवादाने ईश्वराला जिंकण्याकरता प्रश्न करू लागले. पूर्वीप्रमाणे प्रश्नोत्तरे होऊन हाच भगवान दत्तात्रेय असा निश्चय झाला. नंतर नमस्कार करुन स्तुती करू लागले. हे दत्त करूणामूर्ते गुरो कृपया रक्षण करा, आपण मंत्रयोग दिला. परंतु याचे संपूर्ण अनुष्ठान अतिकठीण आहे. देह आसनस्थ असला तरी चंचल चित्त धावत असते. म्हणून योगाभ्यासात आम्ही दुर्बल आहोत. योगसिद्धी आम्हास कशी प्राप्त होणार, हे त्यांचे म्हणणे ऐकून दत्तात्रेयाने चैत्र शुद्ध पौर्णिमा चित्रानक्षत्र भौमवार द्वितीय प्रहर प्रथम मुहूर्तावर विश्वरूप धारण केले. नानावर्ण, अनेक हस्तपाद, अनेक मुखे व अनेक नेत्र धारण करणारे विलक्षण तेजस्वी सर्वश्रेष्ठ असे ते रूप होते. जगाच्या उत्पत्ति स्थिति लयाचे उत्तम अधिष्ठानच दिसले. त्याच रूपाने भगवान बोलू लागले मी निर्गुण निराकार सर्वव्यापी सर्वसाक्षी मायाश्रय आहे. माझ्या ठिकाणी क्रिया कोणतीही नाही. मंत्रानुष्ठान योगसाधन करणारे माझे भक्त यांना मी सुलभ मार्ग सांगतो श्रद्धेने व प्रेमाने साधन करून माझे निरंतर स्मरण करावे. त्यांची कामनापूर्ण होईल. माझे भाषण सत्य आहे असे सांगून विश्वरूप गुप्त करून पूर्वीचे रूप दाखविले आणि गुप्त झाले. यांचे पूजन अर्घ्यदान करुन गोप्रदान करावे.
श्री मायामुक्तावधूताय नम : १०
मायामुक्ताय शुद्धाय मायागुण हरायते ।
शुद्धबुद्धात्मरूपाय नमोऽस्तु परत्मात्मने ।।
मायामुक्ताय शुद्धाय मायागुण हरायते ।
शुद्धबुद्धात्मरूपाय नमोऽस्तु परत्मात्मने ।।
एकदा आपल्या प्रेमळभक्तांचा भाव पाहण्याकरिता वैशाख शुद्ध चतुर्दशी बुधवार स्वाति नक्षत्र माध्यान्हि भगवान भिक्षु रूपाने प्रगट झाले. शील नावाच्या बुद्धिमान ब्राह्मणाच्या गृहात श्राद्धकाळ असताना आले. सुवर्णाप्रमाणे कांतीमान अतिसुंदर द्विबाहु तारूण्यपूर्ण शरीर, कौपीन वस्त्रधारण करून भिक्षापात्र व दंड हातात घेऊन अकस्मात पानावर येऊन बसले.
बरोबर कृष्ण वर्णाचा एक कुत्रा होता. त्यांना पाहून ब्राह्मण क्रोधयुक्त झाले. धिक्कार करून कठोरवाणीने तू कोण असा प्रश्न त्यांनी केला. मी अप्रतीत स्वरूप आहे असे उत्तर दिले. शीलाला हे पूर्वीचेच किंवा नव्हे असा संदेह उत्पन्न झाला म्हणून शीलाने अनेक प्रश्न विचारले. उत्तरावरून हे आपले गुरु असे जाणून त्यांनी नमस्कार केला. उचित उपचाराने पूजन केले. श्राद्धार्थ केलेल्या अन्नाचे भोजन घातले. तांबूल देऊन नीरांजन ओवाळले. हे त्याचे वर्तन पाहून ब्राह्मण क्रोधाने अद्वातद्वा भाषण करू लागले. त्यांना पाहून गावातील बरेच ब्राह्मण गोळा झाले. भिक्षूला तीक्ष्ण शब्दानी म्हणाले ‘हे दुष्टा वर्णहीन असा तू तुझे काय सामर्थ्य आहे ते सांग.’ भिक्षू म्हणाले ‘ते ब्रह्म म्हणजे काय, तसेच कर्म म्हणजे काय ते मला सांगा मला समजले नाही. मी फक्त आत्म्याला जाणतो.’ ब्राह्मण म्हणाले ‘ॐ! हे ब्रह्म वेदाने सांगितलेले कर्म नित्यनैमित्तिक.’ भिक्षु म्हणाले ‘वेद म्हणजे काय त्यांनी काय सांगितले ते सांगा.’ ब्राह्मण म्हणाले 'एकवेद चार प्रकारचा आहे तुला कर्मभ्रष्टाला वेद श्रवणाचा अधिकार नसल्याने सांगता येत नाही. भिक्षु = मायामुक्त मी असल्याने मला वेदाचा अधिकार नाही. मी गुणत्रयात्मक कार्याला शाश्वत स्पर्श करीत नाही. गुणात्रयात्मकसर्ग हा काळा कुत्राच असे मी कल्पिले आहे. मी आत्मवान असल्याने मायामय कुत्र्याला शिवत नाही. हा सर्व कर्म विशारद चतुर्वेदवेत्ता विद्वान आहे. तोच वेद सांगेल. सर्व ब्राह्मणांच्या पुढे कुत्र्याला तू वेद म्हण! अशी प्रेरणा केल्याबरोबर चार वेद, धर्मसूत्रे व्याकरणादिशास्त्रे यांचा पाठ त्याने केला. अधिकारी असलेल्या शीलादिक ब्राह्मणांची अध्यात्मज्ञानामध्ये योजना करून भिक्षु तेथून निघाले. हे पाहून हा सर्वज्ञ परमेश्वर असे जाणून ब्राह्मणांनी प्रार्थना केली. हे देवदेव दुःखनाशक ज्ञान आम्हाला द्या. आपल्याशिवाय आम्हास या संसारातून तारणारा दुसरा कोण आहे. आमच्या कुटुंबाचे रक्षण करा. कर्मजंतु आम्ही आहेत. आमच्यावर प्रसन्न व्हा. अशी प्रार्थना करीत ब्राह्मण त्यांच्या पाठीमागे धावू लागले. त्यांच्या धैर्याची परीक्षा करण्याकरिता ते भयंकर महारण्यात गेले. आसनावर बसून मौन धारण केले. या माायमुक्तावधूताचे पूजन करावे. अर्घ्यदान देऊन दध्योदन समर्पण करावे.
श्री मायामुक्तावधूताय नम : ११
स्वमायागुणगुप्ताय मुक्ताय परमात्माने ।
सर्वत्राज्ञान नाशाय देवदेवाय नमः ।।
स्वमायागुणगुप्ताय मुक्ताय परमात्माने ।
सर्वत्राज्ञान नाशाय देवदेवाय नमः ।।
अवधूत आसनावर बसून ध्यान योगामध्ये रत झाले तर ब्राह्मण बसून राहिले. भगवंतानी मायेने व्याघ्र सर्प वन्हि प्रगट केले तरी त्यांनी अवधूतांचा त्याग केला नाही. तेव्हा पूर्वरूप सोडून मायायक्त रूप घेऊन प्रगट झाले. हा मायायुक्तावधूत अवतार ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी स्वाति नक्षत्र भृगुवारी सूर्योदयी झाला.
त्याने आपल्या मांडीवर सुंदर स्त्री घेतलेली पाहिली. तथापि आलेल्या ब्राह्मणांनी त्यांना सोडले नाही. भगवान ध्यान सोडून तिच्यासह गायन करू लागले. तथापि ब्राह्मण स्थिरच आहेत. तेव्हा मद्यमांसरत तिच्यासह क्रीडा करू लागले. हे पाहून मात्र हा भ्रष्ट आहे असे म्हणून निघून गेले. त्यावेळी भगवान स्वगत म्हणाले, ही नारी दुष्टसंसर्ग नष्ट करणारी, योगाला अनुकूल सर्वदासुखकारक आहे. हे पान हे मांससेवन जनसंसर्ग टाळण्यास उपयोगी आहे असा विचार करून याच रूपाने फिरू लागले. हे वृत्त ऐकून कार्तवीर्याने प्रश्न केला ‘भगवान देवेन्द्राने यांचे अर्चन श्रद्धेने कसे केले ते मला सांगा.’ तेव्हा गर्गमुनी म्हणतात ‘शरणागताचे रक्षण करणे हे व्रत धारण केलेला हा परमेश्वर आहे. याची लीला श्रवण कर.’ ज्याच्यापासून देवेन्द्राला इष्ट सिद्धी मिळाली. दैत्यसेनेसह स्वर्गाकरता जंभासुर व इंद्र यांचे युद्ध सुरू झाले. इन्द्रदेव सेना घेऊन लढत होता. असे शंभर वर्षे झाले. शेवटी देवांचा पराभव झाला. तेव्हा पीडित झालेले देव गुरूस शरण गेले. बृहस्पतीने त्यांना आश्वासन देऊन सांगितले की ‘तुम्ही तपोधन दत्तात्रेयाला शरण जा. तो तुमचे कार्य करील.’ तेव्हा देवासह इन्द्र दत्ताश्रमास प्राप्त झाला. तेथे त्याने अप्रतर्क्यं दत्तात्रेयास पाहिले. अंकावर नग्न पानासक्त सुंदर नारीं बसलेली पाहिली तरी त्यांनी दत्तात्रेयाची सेवा आदराने केली. दत्त बसले असता नमस्कार स्तुती करावी. चालू लागल्यावर त्यांचे मागून चालू लागावे, अशा रीतीन बरेच दिवस सेवा करीत असताना एकदा भगवान म्हणाले ‘देव हो. सेवेने आपणास काय पाहिजे आहे’ देव म्हणाले ‘आमचे राज्य दानवाने घेतले आहे. आमचे अधिकार गेले आहेत. आम्ही भूतलावर मानवाप्रमाणे राहतो. आमच्या रक्षणाकरिता दानवांचा नाश करावा. आम्ही शरणागत आहोत. आपल्याशिवाय आम्हाला गती नाही’ भगवान हसून म्हणाले ‘मी उच्छिष्ट मद्यासक्त मत्त आहे. स्त्रीसंग दुःखाला कारण परंतु देवयोगाने स्थितीस मी प्राप्त झालो. तेव्हा मी काय करणार’ तेव्हा देव म्हणाले ‘आपण निष्पाप ज्ञानरूप आहात. ही नारी म्हणजे जिच्यामुळे सद्गती मिळते अशी विद्याच आहे. सूर्यप्रभेला जसे कोणाचाही स्पर्श झाला तथापि पुण्यपाप नाही. तशीच ही आपली प्रकृती आहे.’ श्री दत्त म्हणाले ‘असा आपला निश्चय आहे तर युद्धाकरता बोलावून दैत्यास येथे आणा’ त्याप्रमाणे देव युद्ध करु लागले. दैत्यांनी शस्त्रास्त्रानी देवांचा पराभव केला. देव पळू लागले. दैत्य पाठीमागे लागले व दत्ताश्रमास आले. दिंगबर बसलेले दत्त व त्याच्यासमीप सुंदर प्रमदोत्तमा नारी पाहून काम मोहित झाले. देवास सोडून, स्त्री रत्न घ्यावे व कृतार्थ व्हावे असे ठरवून त्या स्त्रियेला बलात्काराने उचलून शिबिकेत ठेवले आणि शिबिका डोक्यावर घेऊन चालू लागले. तेव्हा भगवान म्हणाले ‘देवहो पहा परांगनेचा अपहार हे महापातक यांनी केल्यामुळे त्यांचे बळ, तेज नष्ट झाले आहे.’ ही त्यांची मस्तके तोडून सत्वर परत येईल. तेव्हा हे मृतासारखे झाले आहेत. भिऊ नका. शस्त्राने त्यांची मस्तके उडवा. हा विजयक्षण आहे. निमित्त तुम्ही व्हा. असे सांगितल्यानंतर देवांनी शस्त्रांनी त्यांची शिरे तोडली. ते नष्ट झाले. ती नारी देवाकडे परत आली. दत्ताच्या आज्ञेने देव स्वर्गास गेले. हे कार्तवीर्या तूं दत्तास शरण जा. असे गर्गमुनीनी श्रीदत्ताचे महत्त्व सांगितले. श्रीदत्ताचे आराधन करून कार्तवीर्य उभय सिद्धिसंपन्न झाला. त्याने योगाचा प्रश्न केला. श्रद्धा ठेवून भक्ताने चित्त माझे ठिकाणी ठेवणारा मला प्रिय होतो. राजा, याप्रमाणे तू योगधारण कर, माझा प्रसादाने माझ्या सायुज्यास प्राप्त होशील. या गुरुवचनाप्रमाणे राजाने योगानुष्ठान प्रेमाने व ईश्वरस्मरणाने केले. हृदयात तत्त्व भासू लागले. गुरो गुणाकार गुरोत्तम आपले सान्निध्य असावे अशी त्यांने प्रार्थना केली. प्रसन्न होऊन दत्त म्हणाले ‘माझ्या प्रसादाने, परतत्त्व तुला समजले. दृढ होईपर्यंत यत्नानें अभ्यास कर. चिरकाल अनुभव घे त्याने कृतकृत्य होशील.’ असे सांगून त्याचे मस्तकावर उजवा हात ठेवला. राजा तू कृतार्थ आहेस असे सांगितले. तो गुहेमध्ये गेला. आसनस्थ होऊन ध्यान करू लागला. थोड्याच काळात दृढासनी झाला. समाधी लागली. बारा दिवसांनी उठला व पुनः बसला. एक महिन्याने जागृत झाला. पुन: तीन महिने झाल्यावर उठला. दत्त आलिंगन देऊन म्हणाले, अनुभव काय आला ते सांग. कार्तवीर्य म्हणतो, ‘अनुभव हे पृथक् कोठे आहेत. सर्वत्र मीच आहे. भवसागरातून पार होऊन परमानंदात निमग्न झालो. मी ज्ञातव्य जाणले. कर्तव्य केले. प्राप्तव्य मिळाले. केवळ आत्मसुख सोडून माझे मन कोठेही जात नाही. राज्याने सुख नाही. राज्यत्यागाने दुःख नाही. आपल्या आज्ञेने मी ध्यानात प्रवेश करतो. सगुण अथवा निर्गुण असा काहीच आग्रह नाही.’ दत्तात्रेय म्हणाले ‘राजा स्नान कर ! नित्यकर्म कर. आहार घेऊन समाधीचा स्वीकार कर.’ याप्रमाणे करून तो समाधीत निमग्न झाला. दत्तांच्या इच्छेने सहा महिन्याने उत्थान झाले. पुनः बैस अशी आज्ञा झाली. बसला तो वर्षाने जागा झाला. नमस्कार करून गुरुपुढे उभा राहिला. नम्र आणि शांत असलेल्या भक्ताला भगवान् म्हणाले, ‘वत्सा, तू विचारलेस मी सांगितले. आचाराचे आता प्रयोजन नाही. तथापि लोकोपकाराकरिता सनातन धर्माप्रमाणे वागावे. उचित क्रिया गृहस्थाने सोडू नयेत. वस्तुतः तो आत्मरति असल्याने कोणतेही कर्तव्य त्यास नाही. द्वयातील योगी व साक्षात्कारी हे दोघे आनंदपूर्ण आहेत. नगराला जा. पृथ्वीचे पालन कर. यज्ञानी देवाचे, श्राद्धांनी पितरांचे, दानांनी द्विजांचे पूजन कर. पुन: पुन्हा प्रीतीने माझे दर्शन घेत जा. राज्यात असतानाही माझे स्मरण करीत रहा. अंतर्निष्ठ राहून प्रवाहपतित कर्म करावे. तुला कर्मलेप नाही. प्रारब्ध असेपर्यंत जीवन्मुक्त रहा. शेवटी विदेह कैवल्य प्राप्त होईल.’
महाबुद्धिमान परशुरामाने आश्रमात प्रवेश केला. निष्पापदेवीसह दिगंबर बसलेल्या दत्तात्रेयास पाहिले. नमस्कार केला. भगवान कृपा करा. मी पितरांचा संस्कार करण्याकरता येथे आलो आहे. त्याचा विधि मला सांगा. श्री दत्त म्हणाले मी अनाचारी आहे. ‘मला धर्म अधर्म माहीत नाहीं. मी पिशाच्चाप्रमाणे यथेष्ट वागत असतो’ राम म्हणतो आपण योगीश्वर सर्वगुरू जगत्प्रभू आहात. आपण गुणातीत आहात. आपणास धर्माधर्म कोठून असणार, राम म्हणतो ‘भगवान् मी पृथ्वी नि:क्षत्रिय करण्याची प्रतिज्ञा केली आहे. ती आपल्या प्रसादाने खरी व्हावी. दत्त आलिंगन देऊन म्हणाले’ तू माझा सखा आहेस. सत्य प्रतिज्ञा होशील. दत्ताच्या आज्ञेने आपल्या बाणाने पर्वताचा भेद करून सर्व तीर्थे आणली. त्यात स्नान केले. नंतर रेणूकेने स्नान केले. गुरूच्या सांगण्याप्रमाणे चितेवर जमदग्नीचे शरीर ठेवून वन्हि दिला. सुमंगल असलेल्या रेणूकेने त्यांत उडी टाकली. राम म्हणतो 'हे देवा नमस्कार ! आपण माझे सखे आहात. आपण आचार्य व्हा. मी और्ध्वदेहिक कार्य करतो. त्याचा विधि माझेकडून करावा. नंतर अंजलीदान, पिंडनिर्वाणपणादि सर्व कार्य आचार्यानी करविले. दत्त म्हणाले ‘रामा, माता, पिता कोठे गेले तू जाणतोस काय?’ राम म्हणाला तू ‘आपल्या प्रसादाने ते स्वर्गाला गेले’ भगवान् म्हणाले ‘मृत स्वर्गाला जातात ही अज्ञभावना आहे. ते मृत झाले नाहीत व स्वर्गालाही गेले नाहीत.’ पहा. लीलेने विहार करणारे आहेत. आपल्या कांतीने दिशा प्रकाशित करणारे माता पिता त्यांनी पाहिले. प्रेमाने नमस्कार केला. नंतर ते अदृश्य झाले. दत्त म्हणतात ‘रामा माझ्या तेजाने युक्त होऊन अधार्मिक क्षत्रियांचा नाश कर. तू विजयी होशील. याप्रमाणे २१ वेळा निःक्षत्रिय पृथ्वी रामाने केली. रक्ताची सरोवरे भरली. त्यांत पितरांचे तर्पण केले कश्यपादिऋषिद्वारा सोमयाग केला. सर्व देव तृप्त झाले. ब्राह्मणादिकांना अन्नवस्त्रदक्षिणा देऊन संतुष्ट केले.’ सुवर्ण वस्त्राधनानी आणि परमप्रेमाने आचार्य श्रीदत्तांचे पूजन केले. दत्तांनी सर्व धनादिक ब्राह्मणांना देऊन टाकले. रामाला मांडीवर घेतले. वत्सा हे दुष्कर कार्य तू केलेस. दुष्ट क्षत्रिय हे दुर्जय होते. त्यांचा वध तू केलास आणि विधिवत् यज्ञ केलास. तू शूर आहेस. स्वतः हरी आहेस. राम म्हणतो ‘मी शूर नाही. आपला हा प्रसाद आहे. साधु साधु अशी देवानी आणि मुनीनी प्रशंसा केली. रामाने सर्वांचा सत्कार केला.’ ते सर्व ऋत्विज आपआपल्या स्थानास निघुन गेले. सख्य करुन राम तेथे राहिला. त्याचेवर दत्तात्रेयांनी प्रसन्न होऊन श्रवणाबरोबर मुक्ति देणारे त्रिपुरादेवीचे रहस्य सांगितले. रामा तूं माझा सखा चिरंजीव काही काळ येथे रहा.नंतर लोककल्याणाकरिता पश्चिमसमुद्रावर तपश्चर्या कर. तुझ्या ठिकाणी ठेवलेले माझे तेज दुसऱ्या अवतारामध्ये मी पुन्हा घेईन. तू ब्राह्मसंपत्तीने युक्त होण्याकरिता, तप कर. तू सावर्णिक मन्वंतरात महर्षी होशील. शेवटी माझ्या सायुज्यास प्राप्त होशील. अशा या मायायुक्तावधूताचे पूजन अर्घ्यदान करावे आणि मधुसमर्पणाने श्रीदत्तास प्रसन्न करावे.
श्री आदिगुरवे नमः १२
चिदात्मज्ञानरूपाय गुरवे ब्रह्मरूपिणे ।
दत्तात्रेयाय देवाय नमोऽस्तु परमात्मने ।।
चिदात्मज्ञानरूपाय गुरवे ब्रह्मरूपिणे ।
दत्तात्रेयाय देवाय नमोऽस्तु परमात्मने ।।
मदालसा पुत्र राजा अलर्क हा पितृवात्सल्याने प्रजेचे पालन करीत असे. दुष्टांना शिक्षा शिष्टांचे रक्षण आणि दीनाविषयी कृपा करीत असे. नीतीने व धर्माने वागून भोग भोगीत असे. त्याचा ज्येष्ठ बंधु सुबाहु विव्दान ज्ञानी होता. अलर्काला आत्मबोध करण्याच्या इच्छेने काशी राजाचे सहाय्य घेऊन युध्दार्थ आला.
त्याने नगरीला वेढा दिला. युध्द सुरु झाले. त्यात आपले सैन्य कमी झाले. अमात्य शत्रूला वश झाले हे पाहून अलर्क भयभीत झाला.सुबाहूने सैन्यास सांगून ठेवले की ‘अलर्क पळून जात असेल तर त्यास अडवू नये.’ त्याप्रमाणे अलर्क मध्यरात्री घोडयावर बसून पळून गेला. वनात गेल्यावर त्यास काहीच सुचेना. अलर्काची माता मदालसा ज्ञान संपन्न होती. आपल्या सुबाहू वगैरे तीन मुलांना बाळपणातच उपदेशाने ज्ञान संपन्न केले.परंतु अलर्काला मात्र ज्ञानाचा उपदेश करावयाचा नाही, असे अलर्काच्या पित्याने तिला सांगितले होते.पण मुलाचे हित आपण केले पाहिजे असा विचार करुन दोन श्लोक लिहून एका सुवर्णाच्या पेटीत घातले आणि ती पेटी अलर्काच्या गळ्यात बांधली. तुला ज्यावेळी अडचण निर्माण होईल त्यावेळी पेटी उघडून आतील श्लोक पहा असे सांगितले होते. याची आठवण त्यावेळी त्याला झाली. राज्य गेले. भोग गेले. मोठी अडचण निर्माण झाली. म्हणून पेटीतील श्लोक वाचून पाहिले ‘संग सर्वथा सोडवा’ अशक्य असेल तर सज्जना बरोबर करावा. संत संग भेषज आहे. तसाच दुसरा – ‘काम सर्वथा सोडवा’ सोडणे अशक्य असेल तर मुमुक्षेबद्दल कामधारण करावा. मुमुक्षा, कामजन्य सर्व पीडा नष्ट करणारी आहे, असा श्लोकार्थ मातेचे हृदय जाणून संताचा शोध करू लागला. सह्य पर्वतावर असलेले श्रीदत्त हे संत आहेत असे समजले. आषाढ शुद्ध पौर्णिमा प्रथम प्रहर द्वितीय मुहूर्त शनिवार, भगवान् दत्तात्रेय आदिगुरूरूपाने प्रकट झाले होते. त्यावेळी तेथे जाऊन त्याना अलर्काने शरणागति दिली. नमस्कार करून ब्रह्मन् प्रभो माझ्यावर प्रसन्न व्हा. कृपेने माझे दुःख दूर करा अशी प्रार्थना केली. ती ऐकून हा मदालसा पुत्र महाबुद्धिमान अलर्क आहे. असे बोलून हसले आणि म्हणाले राजा तुला दुःख कशा करता? तू कोण? दुःख कुणाचे कुठे आहे? विचार करून खरे सांग, तेव्हा त्याने मन:पूर्वक बराच विचार केला. मी कोण याचा विचार होऊन आत्मस्वरूपाचा बोध झाला. मी पृथिव्यादि पंचभूते नसून भौतिकही नव्हे. शरीरसमुदाय म्हणजे मी असे मानणाऱ्यास दुःख होते पण ते असत्. मी नित्य आहे. मला क्षय-वृद्धी नाहीत. मी नेहमी एकरूप आहे. मला परिणाम कुठला? देह संग सोडल्यावर दुःख कोठे दिसणार? स्थूल सूक्ष्म देहात उत्पन्न होणारे दुःख पाहिले तरी मला त्याचा काय संबंध. मी अंत:करण नसल्यामुळे त्याचे दुःख मला नाही. ज्येष्ठ बंधू राज्य करो. मी एक असून मला शत्रुमित्र सुख-दुःख काही नाही. पूर्वी मोहामुळे होत होते. आपल्या प्रसादाने तो नष्ट झाला. मी प्रकृतीपेक्षा पर आहे. दत्त म्हणाले ‘राजा तू चांगला निश्चय केलास, तुला अहं मम हे दुःखमूळ आता राहिले नाही. स्वानुभवानेच ते तू सोडले आहेस.’ असे गुरूनी सांगितल्यावर अलर्क स्वस्थ झाला. देवाचे पूजन, अर्ध्यदान आणि सुवर्णदान करुन गुरुसंतोष मिळवावा.
श्री शिवरूपाय नम: १३
संसारदुःखनाशाय शिवाय परमात्मने ।
दत्तात्रेयाय देवाय नमोऽस्तु सर्वसाक्षिणे ।।
संसारदुःखनाशाय शिवाय परमात्मने ।
दत्तात्रेयाय देवाय नमोऽस्तु सर्वसाक्षिणे ।।
एकदा माहुरामध्ये वृक्षाखाली व्रात्यवेषाने वेदपठण करीत असलेल्या प्रभूस पाहून, पिंगलनाग म्हणाला, आपला निंद्य असा हा आश्रम कोणता? कौपीन मौंजी नसल्यामुळे ब्रह्मचारी नव्हे. अग्निहोत्रादि नसल्यामुळे गृहस्थ नव्हे. तपादिसाधन नसल्यामुळे वानप्रस्थ नव्हे. नग्न राहून स्त्री मद्याचे सेवनरत रहाणे हा मार्ग आपणास कोणी सांगितला. प्रभू म्हणाले चारीपेक्षा निराळा हा पाचवा आश्रम आहे.
सर्व विश्व आत्मरूप पहाणे. वैराग्ययुक्त होणे. सर्वत्र अभेद दृष्टीमुळे शत्रुरहित असणे. असा हा पाचवा आश्रम आपण ऐकिला नाही काय? हे सर्व ब्राह्मणांना ज्ञात आहे, असे सांगून त्यानी श्रावण शुद्ध अष्टमी सोमवारी अतिसुंदर अति कल्याणमय शिवरूप प्रगट केले. ते पाहून तो विस्मित झाला. नमस्कार करून म्हणाला. भगवान् मी जे धाष्टर्याने अशुभ भाषण केले, त्याची मला क्षमा करा. याप्रमाणे पुन: पुन्हा प्रार्थना करून त्याने त्यांचा अनुग्रह संपादन केला. प्रसन्न अंत:करणाने स्वस्थानी गमन केले. या शिवरूपाचे पूजन करावे. अर्घ्यत्रय द्यावेत आणि निर्मळ उदक समर्पण करावे.
श्री देवदेवाय नम: १४
सर्वापराधनाशाय सवपापहरायच ।
देवदेवाय देवाय नमोऽस्तु परमात्मने ।।
सर्वापराधनाशाय सवपापहरायच ।
देवदेवाय देवाय नमोऽस्तु परमात्मने ।।
मार्कंडेय म्हणाले एकदा भगवान् दत्तात्रेय दक्षिण दिशेला गेले. त्यांनी गमनाने, स्नानाने, भोजनाने लोकांना पवित्र केले. बराच काल तिकडे फिरून सह्याद्रिवर आले. तो रम्य पर्वत पाहून तेथे राहिले. ऋषिरूप स्वीकारून योगाभ्यास करू लागले. त्यांचा आश्रम पुष्पफलांनी रमणीय व समृद्ध होता. तेथे देवसिद्ध किन्नर आणि मुनिवृंद आनंदाने रहात होते. तेथे सिंह व हत्ती, व्याघ्र व हरिण, सर्प आणि मुंगूस वैर सोडून रहात असत. जितेन्द्रिय तपस्वी आणि ध्याननिष्ठ मुनी प्रेमाने रहात होते.
दत्तात्रेय आमलक वृक्षाखाली देवदेव रूपाने शंखचक्रगदा धारण करून स्थित होते. सत्यलोक स्थित ब्रह्मदेव आपल्या परिवारासह दत्ताश्रमास आले. भाद्रपद शुद्ध चतुर्दशी भृगुवार शततारका नक्षत्र प्रथम प्रहर, प्रथम शुभमुहूर्तावर देवदेव त्यांना दिसले. ते सगुण गुणरहित नामरूपरहित नामरूपधर, अति तेजस्वी किरीट धारणाने योग्यांनाही आल्हादित करणारे रूप पाहून साष्टांग नमस्कार केला आणि ब्रह्मदेव स्तुति करु लागले. ब्रह्मदेव म्हणतात हे भगवन् आनंदकारका, भुवनधारका, देववृंद संतोषदायका, तुझा जयजयकार असो. पंचभूतांची उत्पत्तिस्थितिलय करणाऱ्या विद्वानांना आनंद देणाऱ्या परमहंसास परमानंद देणाऱ्या, शंकरादी सर्व देवाकडून पूजन घेणाऱ्या देवा तुझा जयजयकार असो. अशी स्तुती करून पुन: नमस्कार केला. तेव्हा दत्तात्रेय देवदेव म्हणाले ‘वर मागून घे.’ ब्रह्मदेव म्हणाले ‘मुनिरूप दुर्लभ आणि तुझे दर्शन दुर्लभ आहे. ते दोन्ही मला घडले. दुसरे मी काय मागावे? आपल्या दर्शनाने मी कृतार्थ झालो. कृतकृत्य झालो. अद्यापि माझी यातायात संपली नाही. पुनर्भव नसावा. एवढी कृपा करावी’ देवदेव म्हणाले ब्रह्मन् माझ्या दर्शनाने आता तुझे कर्मफल संपले. माझ्या स्वरूपामध्ये तू मुनिसह लीन होशील असा वर त्रैलोक्यानंददायकानी दिला. ब्रह्मदेव परिवारासहित देवदेवाच्या स्वरूपामध्ये लीन झाले. दंडकारण्यात दत्ताश्रमात मुनिसह ब्रह्मदेव मुक्तीला प्राप्त झाले. असा हा देवाचा महिमा आहे. यांचे पूजन करावे अर्घ्यत्रय देऊन तांबूल समर्पण करून संतोष संपादन करावा.
श्री दिगंबराय नम : १५
दु:खदुर्गविनाशाय दत्ताय परमात्मने ।
दिगंबराय शांताय नमस्ते शर्मदायिने ।।
दु:खदुर्गविनाशाय दत्ताय परमात्मने ।
दिगंबराय शांताय नमस्ते शर्मदायिने ।।
सोमवंशात उत्पन्न झालेला बुद्धिमान राजा यदु श्रीदत्ताचे अर्चन करीत असे. तो मृगया निमित्ताने वनात आला असता अवधूतास त्याने पाहिले. त्याची ती दिव्य कांति, विलक्षण तेज, प्रसन्नता आणि आनंदमयता पाहून यदुने नमस्कार केला आणि विनयाने प्रश्न विचारण्यास सुरवात केली. यदु म्हणतो ‘भगवन् मनुष्य हा संपत्ति, कीर्ति व भोग याकरिता सतत प्रयत्नशील असतो. आपण सर्व प्रकारे समर्थ असताना काही न करता स्वस्थ कसे?
आपण चतुर सुंदर व अमृतासारखे भाषण करणारे असूनही जड उन्मत्ताप्रमाणे कोणतेही कर्म करीत नाही व करण्याची इच्छा नाही. सर्व लोक काम आणि लोभ याने पीडित असता आपण कामाग्नीने कसे पीडीत झाला नाही हे कसे ते मला कृपा करून सांगा. तेव्हा भगवान् म्हणाले, 'हे यदुराजा बुद्धीनेच स्वीकारलेले माझे पुष्कळ गुरू आहेत. ज्या ज्या गुरूपासून जी बुद्धी शिकून मी मुक्तरूपाने पृथ्वीवर संचार करतो. ते गुरू मी तुला सांगतो. श्रवण कर. पृथ्वी वायु आकाश प्रभृती हे माझे २४ गुरू आहेत. त्यांच्या वृत्तीवरून मी आपणास घ्यावयाचे किंवा टाकावयाचे गुण शिकून घेतले आहेत. आता यांचेपासून शिकलेले सांगतो.
(१) पृथ्वीपासून क्षमा, पर्वत वृक्षापासून परोपकार व पराधीनता (२) प्राणवायूपासून साध्या आहाराने संतुष्टता, बाह्य वायुपासून अनासक्ती (३) आकाशापासून सर्वत्र आत्म व्याप्ती व असंगता (४) उदकापासून स्वच्छता स्निग्धता व मधुरता ( ५ ) वन्हिपासून तेजस्विता व निर्दोषता (६) चंद्रापासून देह विकारी व आत्मा अविकारी (७) सूर्यापासून निरभिमानता (८) 'कपोतापासून अतिप्रीति व अति लालन पालन करू नये असे शिकलो. (९) प्रारब्ध कर्मभोग अवश्य घडणारा असल्यामुळे त्याकरिता उद्योग करून आयुष्य व्यर्थ घालवू नये. हे अजगरापासून शिकलो (१०) समुद्रापासून प्रसन्नता, गंभीरता आणि अक्षब्धता मी घेतली आहे. रूप, गंध, स्पर्श, शब्द आणि रस या पाच विषयांनी (११) पतंग (१२) मधुकर (१३) मधुहा, (१४) गज (१५) हरिण आणि (१६) मत्स्य हे मोहित होऊन नाश पावलेले दिसतात. म्हणून पाच विषयांविषयी आसक्त न होण्याकरिता हे पाच गुरु आहेत. (१७) आशा दुःख साधन नैराश्य हे सुखसाधन हे पिंगळेपासून शिकलो. (१८) टिटवीपासून संग्रह हा दुःखद असून असंग्रह सुख देणारा आहे हे तत्त्व शिकलो. (१९) बालकापासून निश्चितता मी स्वीकारली (२०) कुमारीच्या कंकणाप्रमाणे एकटयानेच संचार करावा असे कुमारीपासून शिकलो. (२१) बाण करणाऱ्या लोहारापासून एकाग्रता (२२) सर्पापासून जनसमुदायाचा त्याग व एकत्रवास न करणे. मित भाषण करणे (२३) साधनसामग्री नसताना केवळ ईश्वरापासून जगाचे उत्पत्ति प्रलय होतात हे मी ऊर्णनामि = कोळ्याच्या दृष्टांतावरून ठरविले आहे. (२४) भगवंताचे ध्यान करणाऱ्या भक्तांना सारूप्य प्राप्त होते हे मी कुंभारीण नावाच्या कीटकापासून शिकलो. हे यदुराजा या प्रमाणे या चोवीस गुरूपासून मी ही बुद्धी प्राप्त करून घेतली आहे. आता मी स्वत:च्या देहापासून विवेक व वैराग्य शिकलो म्हणून देहाची आस्था सोडून ज्ञानी झालो. ज्ञानामुळे मी कोणत्याही विषयाचा स्वीकार न करता आनंदात असतो आणि असंगपणे सर्वत्र संचार करतो. आत्मज्ञानाकरताच हा देह आहे. तू माझा अर्चक आहेस. या श्रवणाने तुलाही आत्मज्ञान होवो. असे अवधूत दिगंबराने म्हटल्या बरोबर राजा यदु ज्ञानी झाला. सर्व दु:खातून मुक्त होऊन असंगपणे वर्तन करू लागला. आश्विन शुद्ध पौर्णिमा बुधवार सूर्योदयी दिंगबर हा अवतार झाला. याचे पूजनादि करून यदु पृथ्वीवर फिरू लागला. दत्त प्रसादामुळे त्याच्या वंशाचा विस्तार झाला. त्याच्या कुळात भगवान् कृष्ण अवतीर्ण झाले. याप्रमाणे प्रल्हादास प्राप्त झालेल्या दिगंबराच्या भेटीचा महिमाही दिव्यच आहे. प्रल्हादास भागवत धर्माचा लाभ श्रीनारदाच्या कृपेने झाला होता. त्याच्या मध्ये त्याची मती निमग्न झाली होती, तिचा उत्कट प्रभाव त्याच्यावर लोक दृष्टीने प्राप्त झालेल्या सर्व संकटाचा नाश करून भगवद्भाव प्रकट करण्यास कारणीभूत झाला हे सर्व वृत्त प्रसिद्ध आहे. अशा भागवत धर्मामध्ये रममाण झालेल्या प्रल्हादास परमशांतीचा लाभ झाला नाही . तो व्हावा अशी इच्छा प्रबळ होती. तथापि त्याचे साधन आत्म साक्षात्कार असून तो ईश्वर इच्छेवर अवलंबून आहे. हे प्रल्हादास माहित होते. म्हणून ते भगवद्भक्त उदासीनपणाने वागत होते. मृगया निमित्ताने सहज वनात प्राप्त झाल्यावर भाग्यानेच भूमीवर निंद्रित मलीन शरीर पण तेजस्वी प्रसन्न आणि प्रशांत दिगंबर दिसले. त्यांचे स्वरूप पाहून प्रल्हादास फारच आनंद झाला. पूर्ण शांती संपन्न, महासमर्थ, औदार्य, चातुर्य यानी मंडित, उपकारदक्ष अशी व्यक्ती ईश्वरकृपेनेच आपणास दिसली. त्यांच्या प्रसन्नतेचे वैभव काही वेगळे आहे. यांना काही प्रश्न विचारावेत असे वाटल्यावरून प्रल्हादाने अनेक प्रश्न त्या दिगंबरास केले. प्रल्हादाची नम्रता, प्रश्नचातुरी आणि त्याची नि:सीम भक्ती पाहून दिगंबर संतुष्ट झाले आणि बोलू लागले 'प्रल्हादा या तुझ्या प्रश्नाने मी तुझे सर्व रहस्य जाणले आहे. अरे, ज्याच्याकरिता भगवान नृसिंह अवतीर्ण झाला तोच तू. मुनीचा शिष्य उत्तमभागवत होऊन प्रश्न करीत आहेस. तुझ्या प्रश्नांची सर्व उत्तरे मी देतो. ती तू लक्षपूर्वक ऐक, असे सांगून सर्व उत्तरे मधुर मधुर दृष्टांताने त्यानी दिली. ती ऐकून विलक्षण समाधान प्रल्हादास झाले. शेवटी दिगंबर म्हणाले आत्मसाक्षात्कारानेच परमशांतीचा लाभ होतो, याकरता सर्व विकल्प चित्तांत लीन करावेत. चित्त मनात, मन अहंकारात, अहंकार मायेत, माया आत्म्यात लीन करावी आणि केवळ आत्मरूप व्हावे. शुद्ध परमात्मा मीच आहे. अशा ज्ञानाचे दाढर्य संपादन करावे. यासच तत्त्वसाक्षात्कार म्हणतात. मी हे रहस्य तुला थोडक्यात सांगितले आहे. तू खरा अधिकारी आहेस. सांगितल्याप्रमाणे तू कर. तुला साक्षात्कार होऊन परमशांतीचा लाभ होईल. त्यांच्या सांगण्याप्रमाणे. वृत्तीचा लय करून तो साक्षात्कार संपन्न झाला. पूर्णशांत होऊन दिगंबराची सेवा करु लागला. तेव्हा दिंगबर म्हणाले अलिप्त राहून राज्य कर. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे काही काळ राज्य करून प्रारब्ध भोगून शेवटी राज्य पुत्रास देऊन तो मुक्तसंग झाला. पृथ्वीवर संचार करू लागला. याप्रमाणे दिगंबराच्या उपदेशाने प्रल्हाद कृतकृत्त्य ह्याला. असा हा दिगंबराचा अद्भूत प्रकार पाहून बऱ्याच ऋषींनी त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. सर्व संदेह नाहीसे होऊन ते ज्ञान संपन्न झाले. ज्ञानाचा महान आनंद मिळाल्यामुळे ते सर्व ऋषी दिगंबराचे यशोगान करू लागले. असा सर्वच दिगंबराचा जयजयकार चालू असता साध्यदेव दिगंबराकडे आले. प्राचेतस् दक्षाची कन्या व धर्मऋषीची पत्नी जी साध्या तिचे पुत्र हे साध्यदेव म्हणून प्रसिद्ध आहेत. हे देव यज्ञभाग ग्रहण करणारे असून यांना यज्ञात पूज्य मानले आहे. हे साध्यदेव दिगंबराचे दैदीप्यमान स्वरूप पाहून आश्चर्यचकित झाले. वस्त्र व उपकरण यांचे जवळ काहीच नाही. आनंदाचे साधनही दिसत नाही. परंतु लोकोत्तर आनंद यांचे जवळ दिसतो. मुनि मंडळाला उपदेश मात्रानेच आनंदित करणारी एक विभूती ही आहे. तेव्हा यांचेपासून श्रेयोमार्ग समजून घ्यावा. असे विचार त्यांचे मनात आले. त्यांनी दिगंबरास नमस्कार केला आणि प्रश्न केले. भगवन्श्रेयोमार्ग अत्यंत कठीण असून तो प्राय: समजत नाही. याकरिता आपण प्रसन्न होऊन आम्हास या श्रेयोमार्गाचा थोडक्यात व नि:संदिग्ध उपदेश करावा. दिगंबर म्हणाले 'देव हो श्रेयोमार्गाची जिज्ञासा होणे हे भाग्याचे लक्षण आहे. पुण्यवानासच ती उत्पन्न होते. श्रेयोमार्ग हा अत्यंत रम्य असून मानवाने त्याचे आचरण केल्यास, परमपदाची प्राप्ती होते. म्हणून थोडक्यात श्रेयोमार्गाचे रहस्य सांगतो कामक्रोध व द्रोह सोडावेत. गर्व व अहंकाराचा त्याग करावा. निंदा करू नये. दुसऱ्याचे छिद्र पाहू नये. तत्त्वचिंतन करावे. उत्कर्ष अपकर्ष, सिद्धि असिद्धि, हर्षशोक प्राप्त झाले असता बुद्धी सम शांत ठेवावी. दुर्वृत्तापासून परावृत असावे. हा श्रेयोमार्ग आहे. याचा स्वीकार करावा. याचा स्वीकार करून साध्यदेव दिगंबराच्या अनुग्रहाने पूर्ण झाले. असा हा दिगंबराचा महिमा प्रसिद्ध आहे. दिगंबराच्या नामस्मरणाचा महिमाही अचिंत्य आहे. दिंगबरा दिंगबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, हे मंत्रात्मक नामस्मरण रूप भजन आहे. हे भजन करणाऱ्या भक्तांचे रक्षण भगवान् दिगंबर आपणहून करतात असा अनुभव अनेक भक्तांना आलेला आहे. त्याचे पाप, ताप दैन्य नष्ट होऊन ते पुण्यवान् व सुखी होतात. हे भजन दत्तात्रेयास अत्यंत प्रिय आहे याचा थोडक्यात अर्थ : - दिगंबरा दिगंबरा या पदानी तीव्र विवेक व तीव्र वैराग्य यानी संपन्न असलेली महामहिमाशाली व्यक्ती उपस्थित होते. श्रीपादवल्लभ या पदानी ऐश्वर्य लक्ष्मी ज्याच्या पदकमलाची सेवा करते व मोक्ष लक्ष्मीला जो अत्यंत प्रिय आहे तो दिगंबर सर्वोत्कर्षाने प्रकट होतो. तो अचिंत्य भगवान् आम्हावर प्रसन्न होवो. अशा दिगंबराच्या भजनाने मानव निर्दोष होऊन भक्त बनतो. भगवान् त्याचे सर्व मनोरथ पूर्ण करतात. मानवाने थोडे सुकृत व थोडे साधन करीत रहावे. ईश्वरी शक्तीचा लाभ त्याला नि:संशय होईल. अनेक जन्म साधन करीत राहिल्यास ईशशक्तीने पूर्ण होऊन तो दिगंबरपदास प्राप्त होतो. आपआपल्या संप्रदायातील साधन मोठ्या आग्रहाने करण हा एक ईश्वर संतोष संपादन करण्याचा निश्चित उपाय आहे. अवधूताने सांगितलेला श्रेयोमार्ग शक्य तितका अनुसरावा. सद्ग्रंथ वाचन, सद्विचार नहमी करीत रहावे. सत्संगतीत काल सांगितल्या प्रमाणे घालवावा. याप्रमाणे वागण्याने सुंदर व्यवहार होऊन मानवाचे क्रमाने कल्याण होते. अर्घ्यप्रदान करावे आणि वस्त्रमाला समर्पण करून संतोष संपादन करावा. हा भगवान् दिगंबराचे पूजन भक्तिगम्य आहे.
श्री कृष्णश्यामकमलनयनाय नम: १६
अखंडाद्वैतरूपाय निर्गुणाय गुणात्मने ।
कृष्णाय पद्मनेत्राय नमोऽस्तु दत्तरूपिणे ।।
अखंडाद्वैतरूपाय निर्गुणाय गुणात्मने ।
कृष्णाय पद्मनेत्राय नमोऽस्तु दत्तरूपिणे ।।
योगिराजादि अवताराने पृथ्वीवर ज्ञान भक्ती वैराग्य अष्टांगयोग सांगितले. नाना अधिकाऱ्याकरिता नाना साधने, नानारूप धारण करून या परमात्म्याने प्रकाशित केली आणि कृतकृत्य झाल्यासारखे दाखवून ज्ञानपर्यंकावर योगनिद्रेचा स्वीकार करून राहिले. सर्व भक्त व सर्व शिष्य आले. प्रेमाने नमस्कार केला. ते पहात असता कार्तिक शुद्ध द्वादशी बुधवार रेवती नक्षत्र सूर्योदयसमयी, इंद्रनीलाप्रमाणे कांतिमान्, ध्यान मंगल, दशदिशा प्रकाशित करणाऱ्या तेजस्वी रूपाने भगवान् आविर्भूत झाले केवळ ध्यानाने मानवांना सर्वाभिष्ट देणारा सर्व धर्ममय अतिपवित्र सत्य संकल्प प्रभू सर्वासमक्ष गंभीरवाणीने म्हणाले,
‘भक्तहो सारातील सार काढून हे शीघ्र मोक्ष देणारे ध्यानरूप साधन तुम्हाला दिले आहे. सनातन वैदिक धर्म हा अनिष्ठाचे निवारण करणारा व इष्टार्थ देणारा आहे.’ तो प्रमाणसिद्ध आहे. नित्य आहे. त्याने माझ्या ध्यानास प्रतिबंधक असलेल्या पातकाचे निवारण करावे आणि ध्यान करावे. त्याने माझे सायुज्य मिळेल. इतके बोलून भगवान् स्वस्थ झाले, तथास्तु म्हणून सर्वांनी त्याचा आनंदाने स्वीकार केला. परमशांत कृष्णश्याम कमलनयन देवाचे भक्तीने पूजन करावे. अर्घ्यत्रय देऊन रौप्य दान करावे. आपल्या शक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन घालावे. भगवान् प्रसन्न होतो भक्तांचे कल्याण करतो.
भगवान् दत्तात्रेयाचे असे हे सोळा अवतार आहेत. त्याचे थोडक्यात स्वरूप श्रीक्षेत्र नरसोबावाडी जि. कोल्हापूर येथे मिती भाद्रपद कृष्ण द्वितीय शके १९०२ दि. २६-९-८० शुक्रवार दिवशी होणाऱ्या श्री कन्यागत महापर्वोत्सवाकरिता प्रसिद्ध होणाऱ्या स्मरणिकेकरिता लिहिले आहे. त्याचे श्रवण मनन केल्याने जन्ममरण भयाचा परिहार होतो. अत्रिऋषींच्या तपश्चर्येने अत्यंत संतुष्ट होऊन ज्यांनी त्याला आपला आत्माच दिला व सर्वथा निर्दोष असलेल्या अनसूयेच्या ठिकाणी अत्रिपुत्र म्हणून तो प्रभू अवतीर्ण झाला तोच भगवान् श्रीदत्तात्रेय होय. ज्यांनी आपल्या दिव्य योगाने कार्तवीर्यार्जुन यदु व अलर्क प्रभृती स्वभक्तांचे मनोरथ पूर्ण करून त्यांना आपले स्वपद दिले. त्याच भगवान् दत्तात्रेयांनी श्रीपादश्रीवल्लभ अवतार धारण करून आपल्या भक्तांचा उद्धार केला. तोच भगवान् पुनः वात्सल्यातिशयामुळे श्रीनृसिंह सरस्वती स्वामी महाराज या रूपाने अवतीर्ण होऊन सिद्धादिक भक्तांचा उद्धार करणार परमगुरु भगवान् स्मर्तृगामी दत्तात्रेय कृष्णाभीमा तीरावर म्हणजे औदुंबर श्रीनृसिंहवाडी व गाणगापूर येथे जयजयकारास प्राप्त होत आहे. श्री कन्यागत महापर्व महोत्सव श्रीक्षेत्र नरसोबावाडी येथे वरील दिवशी होणार आहे. तेव्हां नरसोबावाडी क्षेत्राचे थोडे वर्णन प्रासंगिक आहे. हे स्थान कृष्णा पंचगंगा यांचे संगमावर असून निसर्ग रमणीय आहे. याची परम पवित्रता प्रसिद्ध आहे. या ठिकाणी श्रीनृसिंह सरस्वती दत्त महाराज येणार आहेत हे पूर्वीच योगसामर्थ्याने जाणून पूज्य श्री रामचंद्र योगी प्रभृती सत्पुरूषांनी या स्थानामध्ये येऊन तप करण्यास सुरवात केली होती. अशा रमणीय व परम् पवित्र स्थानामध्ये महाराज येऊन त्यानी हे स्थान आपली तपोभूमि बनविले. या ठिकाणी १२ वर्षे श्रीनृसिंह सरस्वती स्वामीमहाराजानी तप केले. यामुळे हे स्थान सिद्धक्षेत्र म्हणून प्रसिद्धीस आले. येथे कृष्णेच्या प्रवाहामध्ये शुक्ल, पापविनाशी काम्य, सिद्ध, अमर, कोटि, शक्ती आणि प्रयाग अशी प्रधान अष्टतीर्थे आहेत. त्यांचा महिमा फार मोठा आहे. कृष्णेचा महिमा “कृष्णा विष्णुतनुः साक्षात्” अशा वाक्याने वेदव्यासाने प्रकट केला आहे. साक्षात् विष्णूचे शरीरूप असलेली कृष्णा आणि शिवा, भद्रा भोगावती, कुंभी व सरस्वती मिळून पंचगंगा अशा दोन पुण्य नद्यांचा येथे संगम आहे. हा संगम सर्व संगमामध्ये श्रेष्ठ आहे. येथे औदुंबराचे वृक्षाखाली दत्तात्रेय श्रीनृसिंहसरस्वती स्वामी महाराजानी वास्तव्य केले म्हणूनच 'औदुंबर : कल्पवृक्षः कामधेनुश्च संगमः । चिंतामणी गुरोः पादौ दुर्लभौ भुवनत्रयें ।। अशी या स्थानाची अपूर्व महती गाईली आहे. येथे पूर्वेस अमरेश्वरादि देवतांचे वास्तव्य, पश्चिमेस श्रीरामचंद्र स्वामी प्रभृति योगिजनांचे वास्तव्य व मध्ये चौसष्ट योगिनींचे वास्तव्य या प्रमाणे येथे दिव्यतेची सिद्धता आहे. म्हणून या स्थानावर श्रीनृसिंहरस्वती स्वामी महाराजांचे पूर्ण प्रेम आहे. म्हणून कार्याकरिता गाणगापुरास गेले तरी ते गमन बाह्यदृष्टीचे आहे. कारण योगिनींना सांगितले की हे स्थान प्रसिद्ध होईल. अखिल लोक याचे पूजन करतील त्यांचे सर्व मनोरथ पूर्ण होतील. तुम्ही त्यांना सहाय्य करा, मी येथेच रहातो. माझ्या ‘मनोहर पादुका' येथे मी स्थापन करतो. त्या पादुकांचे तुमचे व औदुंबराचे जे पूजन करतील त्यांच्या सर्वकामना तत्काळ पूर्ण होतील. असा योगिनीना वर दिला. याप्रमाणे येथे पादुका स्थापन केल्या व त्यांची निरंतर पूजा चालावी अशी महाराजानी व्यवस्था स्वतः केली तो प्रकार प्रसिद्ध आहे. भगवान दत्तात्रेय श्रीनृसिंहसरस्वती या कृष्णा तीरावर म्हणजे नृसिंहवाडीमध्ये सतत जागरूक आहेत. पुढे घोर अशा कलिकाळामध्येसुद्धा जागरुक राहतील. कलियुगामध्ये अन्यदेवता निद्रिताप्रमाणे असतात. परंतु श्रीनृसिंह सरस्वती दत्तमहाराज हे सतत जागरूक आहेत. याप्रमाणे भाविकांना आजही तसा अनुभव येत आहे व अनेक भक्तांचे मनोरथ पूर्ण होत आहेत. अशा या जागरूक क्षेत्रात कृष्णेच्या पवित्रतम अशा शुक्ल तीर्थात बारा वर्षांनी येणाऱ्या कन्यागत पर्वकाळात श्रीदत्तात्रेयाचा स्नानमहोत्सव होत आहे. त्याचे वैभव, श्रीदत्त महाराजांचे शिबिकारोहणाचे दिव्यऐश्वर्य, गंगास्नानाचे परमपावित्र्य, 'पूजनादि ब्राह्मविधीचे दर्शन तीर्थवास, पुण्यवानाशी सहवास अशी सहा ऐश्वर्ये एकदम येथे प्रकट होतात. ही श्रीदत्त प्रभूची परम कृपाच होय. त्याच्या कृपेनेच आम्हाला दर्शन स्नानादिकाचा लाभ होणार आहे. असे अपूर्व पुण्य वैभव येथेच पहावयास मिळेल. तरी सर्व भाविकानी त्याचा लाभ करून घ्यावा. श्रीदत्त महाराजांना सर्वांना तशी बुद्धी द्यावी आणि महोत्सव पूर्ण वैभवाने व्हावा सर्वांना समाधान लाभावे अशी श्रीदत्त महाराज यांचे दिव्य चरणी प्रार्थना करून हे वाङ्मय पुष्प नानाविधरूपाने प्रकट होऊन भक्त कार्य करणाऱ्या त्या प्रभूचे चरणी अर्पण करीत आहे. पं श्रीपादशास्त्री जेरे, कोल्हापूर
श्री दत्त मंदिर, दत्तवाडी, कुरार गाव, मालाड (पूर्व), मुंबई - ४०० ०९७.

दिगंबरानुचर दास
श्री. जितेंद्र अरविंद देशपांडे
प्रमुख, दासोपंत अध्यासन केंद्र,
सदस्य, दासोपंत संशोधन मंडळ,
अंबाजोगाई, जि. बीड (महाराष्ट्र)
पं. श्रीपादशास्त्री जेरे, कोल्हापूर.
अभय आचार्य
दत्तभक्तचरणरजसेवक
श्री. विनोद आत्माराम पेडणेकर (अध्यक्ष)
श्री दत्तगुरु सेवा समिती, मालाड.
अध्यक्ष
श्री. विनोद आ. पेडणेकर
सचिव
श्री. सुनील अ. मोरे
खजिनदार
श्री. विजय दा. मोरे